विरार – देशभरात नवरात्रीचे नऊ दिवस अगदी आनंदात साजरे होतात. अनेकदा तहान-भूक विसरून तरुणाई बेधुंद होऊन गरबा-दांडिया खेळतात. मात्र विरारमध्ये गरबा खेळणे पिता-पुत्राच्या जीवावर बेतले आहे. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन हा रात्रीच्या सुमारास बिल्डिंगच्या आवारात गरबा खेळत होता. यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याच्या वडिलांनी आणि तिथे असलेल्या नागरिकांनी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात उपचाराआधीच मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकताच या धक्क्याने त्याचे वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. यात त्यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गरबा खेळताना एकाच दिवशी घरातील दोन सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.