नागपूर – जवळपास आठवडाभर गायब राहिलेली थंडी पुन्हा परतली आहे. दोन दिवसांपासुन विदर्भातील तापमानात फारसा बदल झाला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा पसरल्याने हुडहुडी जाणवत आहे.या आठवड्यातही थंडी व बोचरी हवा कायम राहणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो लवकरच चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.या बदलाचा प्रभाव विदर्भात थंडीच्या लाटेत जाणवत आहे.
सकाळपासूनच हवेत गारठा पसरल्याने दिवसाही थंडी जाणवली.त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर स्वेटर्स व जॅकेट्स घालून फिरावे लागले.सायंकाळी थंडी अधिक जाणवत आहे.
ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात एक ते तीन अंशांची घट झाली आहे.नागपूरचेही तापमान अडीच अंशांनी घसरून २७.९ अंशांवर आहे. तर किमान तापमान १६.७ अंशांवर स्थिरावले.ढगाळ वातावरणासोबतच अवकाळी पावसाचीही शक्यता असल्याने थंडी व बोचरे वारे आणखी काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने उद्या १० डिसेंबरनंतर विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची दाट शक्यता वर्तविली आहे