पंढरपूर:- पंढरपुरात एकादशीदिवशी मंदिराची प्रदक्षिणा घालत असताना कोल्हापुरच्या सदाशिव महादेव बारड यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे.त्यांना तात्काळ पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदाशिव यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदाशिव बारड हे अनेक वर्षांपासून माघ वारीला पंढरपूरला पायी येत होते.यंदा ते शनिवार २८ जानेवारी २०२३रोजी पंढरपूरला आले होते. पंढरपुरात आल्यापासून नित्यनेमाने दर्शन, पूजा व प्रदक्षिणा केली. याच पद्धतीने बुधवारी सकाळी माघ एकादशी दिवशी सदाशिव बारड मंदिराची प्रदक्षिणा घालत होते.प्रदक्षिणा घालत असताना अचानक त्यांना चक्कर आली. सदाशिव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.बुधवारी रात्री उशिरा चक्रेश्वरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.