नवी दिल्ली – भारतीय बँकांकडून कोट्यावधींची कर्जे घेऊन ती बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राऊज अव्हेन्यू न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
धनादेश बाऊन्सप्रकरणी मल्ल्याच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीला समन्स बजावूनही तो हजर राहिलेला नाही. त्यामुळे दिल्ली न्यायालयाने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला. त्यानुसार कॅनॉट प्लेस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. किंगफिशर एअरलाइन डिवाळखोरीत निघाल्यानंतर मार्च २०१६ मध्ये मल्ल्या परदेशात पळून गेला. सध्या तो ब्रिटनमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गेल्या जुलैमध्ये कोर्टाच्या अवमान प्रकरणी मल्याला ४ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.