नवी मुंबई- यंदा परतीच्या पावसाचा फटका शेतकर्यांच्या पिकांबरोबर विविध फळांच्या बागांनाही बसला आहे.त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वाशीतील एमपीएससी मार्केटमध्ये दाखल होणारे अंजीर फळ यावेळी १५ दिवस उशिराने दाखल होणार आहे,अशी माहिती फळ व्यापारी बाळशीराम शिंदे यांनी दिली.
फळ व्यापारी शिंदे म्हणाले की,सध्या सफरचंद,डाळिंब आणि सीताफळ या फळांचा बाजारात हंगाम सुरू आहे. मात्र अंजीर फळ कुठेतरीच दिसत नाही.सततच्या पावसाचा फटका या फळाला बसला आहे. त्यामुळे १० नोव्हेंबरपर्यंत या अंजीर फळाची आवक या बाजारात होण्याची शक्यता आहे.अंजीर फळ हे थंड वातावरणात चांगले बहरते. त्याला जास्त पाणी लागते. सततच्या पावसामुळे या फळाचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासुन हवेत गारवा असल्याने १० नोव्हेंबरपर्यंत या फळाचा खरा हंगाम दिसू लागेल. अंजीराचा हंगाम १५ फेब्रुवारी पर्यंत असतो.सध्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथून फक्त एक गाडी भरून अंजीर बाजारात येत आहे. त्याच्या ४० नगाला ३०० ते ४५० रुपये असा भाव मिळत आहे.मागच्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच तब्बल १४ क्विंटल अंजीर फळ बाजारात पोहोचले होते.