संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- पंढरपूर येथील कुंभार घाटाच्या सुरक्षिततेबाबत काय उपाययोजना केल्या? अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारकडे करत त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा आषाढीची वारी कोणत्याही निर्बंधांविना पार पडत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंढरपूरला राज्यात अनन्य साधारण महत्त्व आहे.

ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या मुसळधार पावसात कुंभार घाटावरील निर्माणाधीन भिंत काही लोकांच्या अंगावर कोसळली होती. यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घाट सुशोभीकरणाच्या कामात वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते, असा आरोप करत या दुर्घटनेतील दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, बांधकाम करणार्‍या ठेकेदाराच्या कंपनीचा काळ्या यादीत समावेश करण्यात यावा आणि नवीन निविदा प्रक्रिया राबवून घाटाचं काम चांगल्या प्रकारे करण्यात यावे, अशी मागणी करत अ‍ॅड. अजिंक्य संगीतराव यांनी अ‍ॅड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. यावेळी कुंभारघाट परिसरातील घाण, कचरा, डेब्रिज, दगड यांची तातडीने साफसफाई करण्यात यावी, अशी तोंडी सूचना हायकोर्टाने राज्य सरकारला दिली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेबाबत कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?, त्याबाबतचा अहवाल सोमवार, 27 जून रोजी सादर करा, असे सांगत महाधिवक्त्यांना या सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami