संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

वांद्र्यात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, १६ जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात शास्त्री नगर येथे बुधवारी रात्री झोपडपट्टीतील दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. यात शाहनवाज आलम (४०) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळच्या भाभा आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये २ अल्पवयीन मुले, ६० वर्षांवरील ३ व्यक्ती आणि तरुण मुलांचा समावेश आहे. दरम्यान, रात्री साधारण साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. तळमजला अधिक दोन मजले अशी या वास्तूची रचना होती. या दुर्घटनेमुळे मुंबईतील धोकादायक इमारतींचा आणि घरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या दुमजली इमारतीत बिहारहून आलेले मजूर राहत होते. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, एक रुग्णवाहिका आणि मुंबई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढल्यानंतर आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती होती, त्यामुळे रात्रभर ढिगारा हलवण्याचे काम सुरू होते. मध्यरात्री अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर मुंबई महापालिका आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून तात्काळ माहिती दिली. नुकतंच वांद्रे पश्चिम भागात इमारत कोसळल्याचे ऐकले. महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. जखमींचा नेमका आकडा रुग्णालयाकडून मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्या सर्वांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा. अपडेट्ससाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील, असे ठाकरे यांनी ट्विटवरून सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami