मुंबई- मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांच्या 36 वसाहतीची पुर्नबांधणी करण्यासाठी काही बिल्डर लॉबीला घाई झाल्यामुळे कामगार आणि कामगारांच्या मुलांच्या शाळा, परिक्षा यांचा विचार न करता प्रत्येक वसाहतीला वसाहती खाली करण्यासंबंधीच्या नोटीसा दिल्या होत्या. त्यामुळे सफाई कर्मचार्यांत तीव्र संतापाची लाट पसरली होती. याविरोधात सफाई कर्मचार्यांनी आपल्या कुटुंबासह प्रमुख अभियंता यांच्या ग्रांटरोड येथील कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन यशस्वी केले असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.
जोपयर्र्ंत सफाई कर्मचार्यांच्या मुलांच्या वार्षिक परिक्षा होत नाहीत, प्रत्येक कामगाराला पुन्हा आहे त्याच वसाहतीमध्ये परत घेणार याचे लेखी पत्र दिली जाणार नाहीत, म्युनिसिपल मजदूर युनियनबरोबर सांमजस्य करार होत नाहीत तोपयर्र्ंत कोणतीही वसाहत धाक दाखवून खाली करुन घेऊ नये, अशी मागणी अशोक जाधव यांनी आंदोलनावेळी केली. तसेच महापालिका आयुक्त चहल यांनी जातीने लक्ष घालून सफाई कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस वामन कविस्कर यांनी केली आहे. कामगारांच्या मुलांच्या वार्षिक परिक्षा होण्याअगोदर जर का बळजबरीने सफाई कामगारांच्या वसाहती खाली करुन घेण्याचा प्रयत्न झाला तर सफाई कामगार तीव्र आंदोलन करतील असा इशाराही अशोक जाधव यांनी दिला आहे. सफाई कामगारांना दक्षिण मुंबईत कुठेही 14 हजार ते 20 हजारामध्ये भाड्याने घर मिळत नाही त्यामुळे प्रशासनानेच म्हाडा अथवा एसआरएमार्फत उपलब्ध असलेली घरे द्यावीत अशी मागणीही युनियनने केली आहे.