रायपूर – काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक जरी झालेली असली, तरी पक्षाच्या वर्किंग कमिटीची निवडणूक मात्र होणार नाही . वर्किंग कमिटीचे सदस्य पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेच नियुक्त करतील. असा महत्वपूर्ण ठराव आज काँग्रेसच्या रायपूर अधिवेशनात सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आजपासून छत्तीसगडच्या रायपूर मध्ये काँग्रेसचे ३ दिवसांचे महाअधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी,प्रियांका गांधी, दिग्विजय सिंग आदींसह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मात्र सर्वांना उत्सुकता होती ती वर्किंग कमिटीची निवडणूक होणार कीं नाही याची . कारण हि मागणी काँग्रेस मधील नाराज गटाची होती .त्यावर आज अधिवेशनात चर्चा झाली .जयराम रमेश यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला त्यावर सविस्तर चर्चा झाली आणि वर्किंग किमतीतील सदस्य निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले. याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच वर्किंग कमिटीत माजी पंतप्रधान आणि माजी काँग्रेस अध्यक्षाना स्थान दिले जाईल असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. त्याच बरोबर सर्व राज्यांमधील पक्षसंघटना बळकट करण्यावर भर देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.