मुंबई – गुजरात-मुंबई दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ गाडी पुन्हा एकदा जनावरांवर आदळली आहे. गुरुवारी संध्याकाळी गांधीनगर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या ट्रॅकवर ही जनावरे आली होती. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
या घटनेत रेल्वेच्या पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून ही चौथी घटना आहे.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, ‘उदवाडा आणि वापी दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ८७ जवळ संध्याकाळी ६.२३ च्या सुमारास ही घटना घडली. यात रेल्वेच्या पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे.या घटनेमुळे काही वेळ रेल्वे थांबल्यानंतर सायंकाळी ६.३५ वाजता गाडी पुढच्या प्रवासाला निघाली.दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस आणि प्राण्यांची धडक हे जणू समीकरणच बनले आहे.काल चौथ्यांदा असा अपघात घडला आहे. यापूर्वी तीनवेळेस या ट्रेनची प्राण्यांसोबत धडक झाली आहे.यावर्षी ६ ऑक्टोबरला म्हशीच्या कळपाला ही ट्रेन धडकली होती.त्यानंतर ७ ऑक्टोबरला ट्रेनच्या समोर अचानक गाय आल्याने अपघात झाला,तर २९ ऑक्टोबरला ट्रेनच्या समोर बैल आल्याने अपघात झाला होता.