मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील आपल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात विविधांगी टीकास्त्र सोडले.यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना काही खोचक सवाल करत मिश्किल सल्ला दिला आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या की,’राजभाऊ , ईडीची नोटीस आल्यानंतर तुमचा ‘ लाव रे तो व्हिडिओ ‘ बंद कसा झाला? तसेच तुम्ही आता सुपारीबाज आंदोलने बंद केली पाहिजेत. “
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, राज ठाकरे यांच्या भाषणाचा गोषवारा काढला तर एकाच वाक्यात सांगता येईल. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे होते. ते भाजपाविरोधात बोलू शकत नाहीत.त्यांनी आजवर केलेली आंदोलने निरर्थक असल्याने ते ३६० डिग्रीत फिरत आहेत. एकूणच राज ठाकरे यांची आंदोलने आणि त्यांच्या भूमिकांना अर्थ नाही,असा आरोप करताना सुषमा अंधारेंनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मला वाईट वाटत नाही.इतर राज्यही संघराज्य पद्धतीतील आहे, त्यांचाही विकास झाला पाहिजे,अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.त्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या,असे असेल तर तुमच्या पक्षाचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऐवजी संघराज्य नवनिर्माण सेना करा. टोलचे आंदोलन केले.जो माणूस २५ लाखाची गाडी वापरू शकतो,तो ५० रुपयांचा टोल भरूच शकतो.त्यामुळे टोलनाक्यांचे आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का, हे आंदोलन बघा, असा कानमंत्र सुषमा अंधारे यांनी दिला.
त्याचप्रमाणे वडापावची गाडी हटवा,टॅक्सीवाल्यांचे आंदोलन करायचे,यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केले,यावर राज ठाकरे चकार शब्द बोलत नाहीत.त्यामुळे ते ३६० डिग्री फिरत आहेत. असेच वाटत आहे.त्या सभेत एकनाथ शिंदेंनी जादूची कांडी फिरवली आणि घरात बसलेले मुख्यमंत्री बाहेर निघाले, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचं काय नवनिर्माण करणार आहात, हे पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांबद्दल तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाहीत,ज्या देवेंद्रजींनी मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना, अशी टीका केल. त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त भावकीत भांडण करू शकता,अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.