नवी दिल्ली- २२ वर्षांपूर्वी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील दोषी मोहम्मद अश्फाक आरिफची फाशीची शिक्षा कायम झाली आहे. त्याबाबत त्याने न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज फेटाळली. त्यामुळे आरिफच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
२२ डिसेंबर २००० रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर अतिरेकी हल्ला झाला होता. लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अंधाधुंद गोळीबार केला. त्यात ३ जवान शहीद झाले होते. त्यात ७ व्या राजपूत रायफलच्या २ जवानांचा त्यात समावेश होता. या प्रकरणात पाकिस्तानचा नागरिक असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद आश्फाक आरिफला अटक झाली होती. तो या अतिरेकी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार होता. दिल्ली न्यायालयाने २००५ मध्ये आरिफला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. २००७ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्याला आव्हान देणारी याचिका आरिफने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानेही त्याची शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणात आरिफच्या पत्नीलाही अटक झाली होती. दिल्ली न्यायालयाने ६ जणांना दोषी ठरवले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही आरिफची फाशी कायम ठेवली आहे.