पिंपरी- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे, शेतकर्यांचे, उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोडवण्यासाठी अविरत काम करत आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरासह औद्योगिक परिसरातील ज्या अडचणी भेडसावत आहेत, त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी येत्या बुधवारी सर्व संबंधीत विभाग, पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, आमदार महेश लांडगे, लघुउद्योजक संघटनेचे प्रतिनिधी या सर्वांची मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोशी येथे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या मेळाव्यात दिले.
यावेळी संदीप बेलसरे आणि प्रतिनिधींच्या हस्ते मुख्यमंत्री निधी साठी 8,76,703 रुपयांचा धनादेश देण्यात आला. स्वागत, प्रास्ताविक करताना बेलसरे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना येणार्या विविध समस्या मांडल्या. यामध्ये सर्व आस्थापनांना पूर्व लक्षीप्रभावाने लावलेला शास्तिकर हा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, लघुउद्योजकांना भुखंड उपलब्ध करून द्यावे, उद्योगांना परवानगी मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी, औद्योगिक परिसरातील भुयारी गटार योजना, मलनिःसारण प्रकल्प, महावितरण कंपनीकडून होत असलेला खंडित वीजपुरवठा, एमआयडीसी -3, तळवडे-1, कुदळवाडी-1, सेक्टर 7 – 1 अशी नवीन सबस्टेशन उभारण्याची गरज, औद्योगिक परीसरातील अग्निशमन केंद्राचा प्रश्न, औद्योगिक परिसरातील कचरा गोळा करून त्याचे विलगीकरण करण्याकरिता औद्योगिक परिसरात विलगीकरण केंद्र तयार करावे व त्याद्वारेच कचर्याची विल्हेवाट लावण्याची सोय महापालिकेने करावी. औद्योगिक परिसरातील कर्मचारी, कामगार यांच्यासाठी पीएमपीची अंतर्गत भागात बस सुविधा उपलब्ध करणे, अनधिकृत भंगारची दुकाने, सातत्याने हाणा-या चो-या, तळवडे-चाकण, भोसरी-चाकण, चिखली, देहू-आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या, औद्योगिक परिसरात ट्रक टर्मिनल सुरू करावे, आदी मागण्या मांडल्या.