नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीचे सत्र कायम ठेवत आज सर्वसामान्यांना झटका दिला. आर्थिक वर्षातील शेवटच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25% वाढ केली. यामुळे बँकेचा प्रमुख व्याजदर 6.50% इतका वाढला आहे. यामुळे नजीकच्या काळात सर्व प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ झाली आहे. या वाढीमुळे आता वाहन आणि गृह कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते जास्त भरावे लागणार आहेत. मे 2022 पासून रेपो रेटमध्ये आतापर्यंत 2.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तीन दिवस भारतीय रिझर्व्ह बँकच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. कमिटीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेट वाढवण्याच्या बाजूने कौल दिला. यानंतर आज सकाळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दासांनी पत्रकार परिषद घेत ही वाढ जाहीर केली. ते म्हणाले की, जागतिक आर्थिक परिस्थिती आता पूर्वीसारखी गंभीर राहिलेली नाही.महागाई कमी झाली आहे. तरी देखील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये महागाई अजूनही लक्ष्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.