मुंबई: -अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख हे त्यांच्या कंपनीमुळे अडचणीत सापडले आहेत. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की रितेश-जिनिलिया यांच्या कृषी-प्रक्रिया कंपनीला मिळालेल्या लोनसंबंधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रितेश-जिनिलियाच्या कंपनीला कर्ज देताना सहकारी बँकांकडून कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली का? याचा तपास या चौकशीत होणार आहे.विशेष म्हणजे अतुल सावेंनी चौकशीचे आदेश दिल्याचे पत्र लातूर भाजपकडून जारी करण्यात आले आहे.
आमदार अमित देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सत्तेचा दुरूपयोग करत आपल्या भाऊ आणि वहिणीला एमआयडीसीत कंपनीसाठी भूखंड आणि कोट्यवधीचे कर्ज मंजुर करून दिल्याचा आरोप भाजपचे गुरुनाथ मगे आणि ॲड.प्रदीप मोरे यांनी केला होता.लातूर एमआयडीसीच्या प्रतिक्षा यादीमध्ये १६ उद्योजकांचा समावेश असून या दोघांच्या कंपनीला केवळ १५ दिवसांत भूखंड देण्यात आला आहे. त्यामुळे १६ उद्योजकांना डावलून या दोघांना इतक्या कमी कालावधीत भूखंड का देण्यात आला?, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.यामुळे रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.