बुलढाणा- काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील शेवटचा दिवस होता. बुलढाण्याच्या जळगाव जामोद येथे यात्रा पोहोचली होती. जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्य प्रदेशात आज प्रवेश करणार आहे.
सकाळी 6.00 वाजता भेंडवळमधून आजच्या यात्रा सुरु झाली. त्यावेळी तेथे या यात्रेत शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मात्र यावेळी सभास्थळी कुणीतरी फटाके लावले. एकीकडे काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत होते तर दुसरीकडे आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. या सगळ्या प्रकारावर काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचंड संतापले. जाणूनबुजून श्रद्धांजली सभेत कुणीतरी फटाके लावल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला. त्यानंतर सकाळी 10 वाजता जळगाव जामोदच्या सातपुडा एज्युकेशन सोसायटी परिसरात यात्रा पोहचली. राहुल गांधींच्या स्वागतासाठी व त्यांच्या समस्या मांडण्यासाठी शेकडो कोळी बांधव मुंबईवरून आले होते. त्यावेळी या बांधवांनी पारंपरिक वेषभूषेत कोळी नृत्य करत राहुल गांधींचे स्वागत केले. त्यानंतर दुपारी 4 वाजता जळगाव जामोद येथील पदयात्रा संविधान चौकात ही यात्रा पोहोचल्यानंतर सायंकाळी 7 वाजता निमखेडी पोलीस चौकीजवळ येथील शेवटच्या ठिकाणी यात्रा पोहचली. त्यानंतर ही यात्रा मध्य प्रदेशात दाखल होणार आहे.