वाराणसी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा प्रयागराज दौरा रद्द करण्यात आला आहे. दौरा रद्द झाल्यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधींच्या चार्टर्ड विमानाने केरळमधील वायनाड येथून उड्डाण केले होते, परंतु त्यांना वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू दिले गेले नाही, असा आरोप आता काँग्रेस नेते अजय राय यांनी विमानतळ प्रशासन आणि भाजपवर केला आहे.
यावेळी एलबीएस विमानतळावर प्रयागराजचे प्रांतीय अध्यक्ष अजय राय यांच्यासह शेकडो काँग्रेस नेते उपस्थित होते. राहुल गांधींना रात्री दहाच्या सुमारास केरळहून वाराणसीला येणार होते. मात्र विमानतळावर दोन-तीन फेऱ्या करूनही विमानतळ प्राधिकरणाने राहुल गांधींच्या विमानाला उतरू दिले नाही. विशेषतः याबाबत स्पष्टीकरण देताना बाबतपूर विमानतळ ऑपरेटरने उड्डाण रद्द केल्याचे सांगितले.