वलसाड – गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील जीआयडीसी मध्ये भीषण आग लागली. येथील वेन पेट्रोकेम अँड फार्मा कंपनीत काल बॉयलरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. स्फोटामुळे तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर, दोघेजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात सारिगम जीआयडीसी आहे. यामध्ये अनेक रासायनिक कंपन्या आहेत. त्यापैकी वेन पेट्रोकेम अँड फार्मा (इंडिया) प्रा. या कंपनीत काल रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. बॉयलरचा अचानक स्फोट झाल्याने आगीची घटना घडली. स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने त्याच्या आवाजाने तीन मजली इमारत कोसळली. पहाटे ४ वाजता इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.