संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राज ठाकरेंकडून फडणवीसांना पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यातील राजकीय वर्तुळात घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. आधी पद स्वीकारणार नाही, असे म्हणणार्‍या फडणवीसांना पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला लावल्याने त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहून त्यांचे अभिनंदन करत मोलाचा सल्लाही दिला आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रिय देवेंद्रजी, सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन! वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…
तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केले. आताचं सरकार आणण्यासाठीदेखील तुम्ही अपार कष्ट उपसलेत. इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षापेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकर्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरंंच अभिनंदन!,
आता जरा आपल्यासाठी
ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. यामागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्‍चित की तुम्ही तुमचे कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलेच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठी तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो. हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami