जळगाव – सध्या राज्यात एवढे पेच आणि प्रश्न निर्माण होत आहेत. पण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे त्यावर चकार शब्द बोलत नाहीत, अशी कडवट टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विविध यात्रा, सभा आणि दौरे काढून पक्ष व संघटना बळकट करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा काढत आहेत. तर दुसरीकडे उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रा काढत आहेत. त्यात त्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ले चढवत आहेत. बंडखोरांवर टीकास्त्र सोडत आहेत. आता त्यांनी यावरून समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. अण्णा हजारे यांचे लोकपाल आंदोलन केवळ एक सरकार उलथवून लावायचे, लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा आणि एक लाट तयार करायची यासाठीच होते. लोकपाल आंदोलनातील त्रुटी कधीच दाखवल्या नाहीत. लोकपाल आंदोलन सत्ता विकेंद्रीकरणाऐवजी केंद्रीकरणावर आणि एक हाती सत्ता देण्यावर भर देणारे होते. संवैधानिक चौकटीच्या बाहेरचे होते, असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला. त्यांच्या आंदोलनामुळे भाजप सत्तेत आली. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे तिघे विभक्त असले पाहिजेत ही घटनेची मूळ चौकट आहे. परंतु जेव्हा या तिघांवर लोकपाल बसवला जातो, तेव्हा ती चौकट मोडण्याचा प्रयत्न होतो. सध्या राज्यात एवढे पेच आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. पण अण्णा हजारे त्यावर चकार शब्द बोलत नाहीत, असा घणाघात त्यांनी केला.