मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. सर्वच स्तरातून राज्यपाल हटाव असा निषेध व्यक्त होत असतानां, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परत जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा शिंदे गटातील आमदार भारत गोगावले यांनी केला आहे.
विशेषतः महाविकास आघाडीसह अन्य नेतेही राज्यपाल हटाव या भूमिकेवर ठाम आहेत. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनीही आक्रमक पवित्रा घेत राज्यपाल कोश्यारींवर टीका केली आहे. राज्यपाल वेळोवेळी अपशब्द काढतात. यावर भाजपचे सरकार कसे शांत राहू शकते. भाजपची दुटप्पी भूमिका आहे. कोश्यारी यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. तसेच जोपर्यंत कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवू असा इशाराच दिला आहे. यानंतर आता शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करु नये. त्यांचा मान राखणे हे सर्वांचे कर्तव्य असलचे म्हटले आहे. तर कितीही मोठा किंवा छोटा कार्यकर्ता असो, बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या विधानामुळे सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य पक्षाच्या वतीने राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलने करण्यात येत आहेत.अद्यापही राज्यपालांविरोधातील राजकीय पक्ष आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त केले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर आता राज्यपाल परत जाण्याच्या तयारीत असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.