मुंबई – माटुंगा येथील इंडियन जिमखाना हा सर्व खेळांसाठी प्रसिद्ध आहे. या जिमखान्याची जागा ही मोठी असल्याने त्याच्या सभोवती झाडे लावण्यात आली होती.परंतु, जिमखान्याच्या आसपासच्या परिसरात इमारतींच्या पुनर्विकासासाठी परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार असल्याने त्यासाठी याठिकाणी असलेली तब्बल ३० झाडे काढून टाकली जाणार आहेत.तसा प्रस्तावच वृक्ष प्राधिकरणाने पालिकेच्या एफ उत्तर विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मात्र या वृक्षतोडीला नागरिकांनी तीव्र विरोध केला असून प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पालिकेने हे रस्ता रुंदीकरण काम एक महिन्यापासून हाती घेतले आहे. विशेष म्हणजे इंडियन जिमखान्याच्या ताब्यातील २० मीटर जागा या रस्ता रुंदीकरण कामात जाणार आहे.त्यामुळेच ही झाडे काढली जाणार आहेत.ही झाडे तोडल्यास इथले नागरिक सावली, ऑक्सिजन,थंड हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाटाला मुकणार आहेत.या परिसराला एखाद्या वाळवंटाचे स्वरुप येणार असल्याचे इथल्या रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ही झाडे वाचविण्यासाठी रस्ता रुंदीकरण कामाला मुंबईकरांनी विरोध करावा तसेच त्यांनी यासंदर्भात आपल्या हरकती आणि सूचना sg-gar-dens @mcgm-gov.in या पत्त्यावर कळवाव्यात असे आवाहन इथल्या स्थानिक नागरिकांनी केले आहे. दरम्यान, जिमखान्याच्या एकाच बाजूचे रस्त्याचे काम अद्याप चालू असून १५ हून अधिक झाडांची तोडणी करण्यात आल्याची खंत इंडियन जिमखान्याच्या काही सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.