नवी दिल्ली- लहानांपासून मोठ्यांपर्यंत आय लव्ह यू रसना म्हणायला शिकवणारे ‘रसना’ कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचे शनिवारी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
खंबाटा यांनी 1970 च्या दशकात महागड्या शीतपेयांना पर्याय म्हणून रसनाची सुरुवात केली होती. स्वस्तात मस्त शीतपेय म्हणून रसना अल्पावधीतच देशभरात लोकप्रिय झाले होते. ज्यावेळी रसना बाजारात आले त्यावेळी मिळणार्या पाच रुपयांच्या पॅकेटमध्ये रसनाचे तब्बल 32 ग्लास सरबत तयार व्हायचे. भारतासह अनेक देशांमध्ये आजही रसनाला मोठी मागणी आहे. सध्या देशात 18 लाख किरकोळ दुकानांवर रसनाची विक्री केली जाते. तर, जगभरात रसना ब्रॅण्डची शीतपेय 60 देशांमध्ये विकली जात आहेत. दरम्यान, खंबाटा यांना वाणिज्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी नॅशनल सिटीझन पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय, सिव्हिल डिफेन्स मेडल, पश्चिमी स्टार, समरसेवा, संग्राम मेडल्स आदी पुरस्कार देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला होता. खंबाटा हे समाज सेवेतही अग्रस्थानावर होते.