संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

रत्नागिरीतील रघुवीर घाट पर्यटनासाठी २ महिने बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. परंतु रघुवीर घाटाजवळील रस्ता व डोंगर भागालगत दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन खेड तालुका प्राशासनाने तातडीने पावले उचलत १ जुलैपासून हा घाट पावसाळ्यात किमान दोन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच पायथ्याशी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोकणातील पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत असलेला रघुवीर घाट ज्याची ओळख मिनी महाबळेश्वर अशी आहे. तो एक जुलैपासून दोन महिन्यांसाठी प्रशासनाकडून पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीत या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या पावसात या दोन्ही ठिकाणी पर्यटनासाठी जाणे हे पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते, ही बाब लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून रघुवीर घाट पर्यटनासाठी पुढील दोन महिने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या बंदीनंतर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त असल्यामुळे या आदेशान्वये पावसाळी पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. परंतु सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने उचलेल्या या पावलाचे स्वागतदेखील पर्यटकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, घाटाच्या पायथ्याशी खोपी येथे खेड पोलिसांकडून सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच येथे बॅरिकेड्स लावून सूचना फलक लावण्यात आला आहे. येथे येणाऱ्या खासगी वाहनांची चौकशी करत पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांना माघारी पाठवण्यात येत आहे.

दरम्यान, प्रांताधिकारी राजश्री मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुवीर घाट बंद ठेवण्यात येणार असल्याचा आदेश पारित केला असला तरी, सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील गावांना विविध कामे, औषधोपचार आणि अत्यावश्यक सेवेसाठी घाटाचा एकमेव पर्याय असल्याने ते या घाटरस्त्याचा वापर करू शकतील, अशी मुभा देण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami