संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

योगी सरकार उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये मराठीचे धडे देण्याच्या विचारात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – महाराष्ट्रात इतर भाषिक तरुणांमुळे मराठी भाषिक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत, हा वाद गेली अनेक वर्षे सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता उत्तर प्रदेशातल्या लोकांना महाराष्ट्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी चक्क उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविण्याचा प्रस्ताव योगी सरकारच्या विचाराधीन आहे. भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी याबाबत सरकारकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर वाराणसीच्या शाळांमध्ये हा प्रयोग करणार असल्याची माहिती मिळत आहे.

कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, ‘मी गेली ५० वर्ष महाराष्ट्रात राहतोय आणि उत्तर प्रदेशशीही जोडलेले आहे. या काळात माझ्या निदर्शनास आले की, उत्तर प्रदेशातील विद्यार्थी नोकरीसाठी महाराष्ट्रात स्थलांतरित होण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होतात. मात्र ज्यावेळी ते प्रत्यक्षात महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना मराठी भाषा अवगत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इतकेच नाही तर, महाराष्ट्र राज्याच्या सरकारी सेवेत रुजू होण्यासाठीदेखील मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी आपल्या राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मराठीचा पर्यायी भाषा म्हणून समावेश करावा’, अशी विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, इतर राज्यांत मराठी भाषेचे धडे देणे हे गौरवास्पद आहे, मात्र महाराष्ट्रात नोकरी मिळावी यासाठी मराठी शिकविण्यापेक्षा आपापल्या राज्यात रोजगार निर्मिती करण्यावर सरकारांनी लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया यावर अनेकांकडून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्द्यावर बोलताना म्हटले, ‘कोणी मराठी भाषा शिकावी, याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही पण उत्तर प्रदेशातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्याऐवजी रोजगार निर्मितीवर काम करावं. जेणेकरून कोणालाही उठसूट नोकरी, रोजगारासाठी महाराष्ट्रात यावं लागणार नाही.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami