कराड- तालुक्यात ऊसतोड सुरू असताना शेतात बिबट्याचे बछडे सापडण्याच्या घटना सतत घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी कराड तालुक्यातील सुपने येथे ऊस तोडणी सुरू असताना मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळले होते. याची माहिती वनविभागास देण्यात आल्यानंतर वनविभागाने बछडे तेथेच ठेवून मादी बिबट आणि बछड्यांची पुनर्भेट घडवली. यापूर्वीही गावांच्या शेतशिवारातील उसाची तोडणी करताना बिबट्याचे बछडे आढळून आले होते, मात्र त्यांची व मादी बिबट्याची पुनर्भेट करण्यात वन विभागाला यश आले होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी येणके येथील एका उसाच्या शेतातही तीन बछडे सापडले होते. या बछड्यांनाही शेतातच सुरक्षितस्थळी ठेवून त्यांच्या आईची वाट पाहण्यात आली. मात्र, अद्याप त्या मादी व बछड्यांची पुनर्भेट होऊ शकली नसल्याचे वनविभागाने सांगितले.