संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

मोनिका मोरेच्या हस्ते मुंबई पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त! पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचा खास सन्मान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंच्या संकल्पनेतून मुंबई पोलिसांचा खास सन्मान करण्यात आला. २०१४ मध्ये घाटकोपर रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या हस्ते मुंबई पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मोनिकाला २०१४ मध्ये दुर्दैवी अपघाताला सामोरं जावं लागलं. यानंतर २०२० ला अवयवदानातून मिळालेल्या चेन्नईतील युवकाच्या दोन हातांनी तिने पुढील आयुष्य सुरु केलं.
नुकतीच तिच्या तळहातांना संवेदना आली आणि हालचाल जाणवू लागली. या नव्याने कार्यरत झालेल्या हातांनी नवीन सुरुवात करतानाच सत्कर्म घडावं, या हेतूने ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचा खास सन्मान तिच्या हस्ते घडवून आणला. पोलीस आयुक्त कार्यालयात मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. मुंबई पोलिसांचं राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीचं योगदान, त्यातही सर्व सण आणि उत्सव यांमध्ये पोलिसांची मेहनत नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असते. यावर्षीची राजकीय स्थिती आणि त्यातही एकाच दिवशी निर्विघ्नपणे पार पडलेले दोन दसरा मेळावे यामध्येही मुंबई पोलिसांचं योगदान अत्यंत मोलाचं होतं. याच कारणास्तव पोलिसांप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार मुळ्येकाकांच्या मनात आला आणि त्यांनी तो प्रत्यक्षात आणला.

या छोटेखानी कार्यक्रमाला न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोनिका मोरेने २०१४ पासून आजतागायत केलेल्या संघर्षाच्या काळात मुळ्येकाकांनी तिला कायम मदतीचा हात दिला आहे. मोनिकाच्या या संघर्षगाथेला पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही सलाम केला आणि तिच्या जिद्दी वृत्तीचं मनापासून कौतुक केलं. दोन्ही हात गमावण्यासारखा अत्यंत भयावह प्रसंग वाट्याला येऊनही मोनिकाने कधीही हार मानली नाही की, डोळ्यातून अश्रूही काढले नाहीत. या प्रवासात ती धाडसाने वाटचाल करत राहिली. सध्या ती परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये सेवेत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami