संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

‘मुस्लिमांची माफी मागा’ म्हणत ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे – गेल्या काही दिवसांपासून प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक महत्त्वाच्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर हॅकर्सकडून हल्ले केले जात आहेत. त्यात आता ठाणे पोलिसांच्या वेबसाईटचादेखील समावेश झाला आहे. ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी वेबसाइट हॅक झाली असून हॅकर्सनी वेबसाइटवर ‘जगभरातील मुस्लिमांची माफी मागा’, असा एक संदेशही लिहिला आहे. हा संदेश भारत सरकारसाठी लिहिण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वेबसाईट हॅक झाल्याची पुष्टी केली असून ‘आम्ही आवश्यक कारवाईसाठी संबंधित एजन्सीशी संपर्क साधला असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकाराची ठाणे पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात आली असली तरी देशातल्या अनेक महत्त्वाच्या वेबसाईट्स या हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर सायबर पोलिसांनी हॅकर्सचा शोध सुरू केला आहे. ‘वन बॅट सायबर टीम- इंडोनेशियन डिफेसर’ असे या हॅकर टीमचे नाव असल्याचे संदेशातून दिसत आहे. त्यावर ठाणे सायबर क्राईमचे पथक काम करत आहे. वेबसाइट उघडल्यावर त्यात ‘हॅक्ड बाय अ सायबर टीम’ असा संदेश लिहिला होता. त्यात पुढे लिहिले होते, ‘नमस्ते भारत सरकार, सर्वांना शुभेच्छा. वेळोवेळी तुम्ही इस्लामिक धर्माचा अपमान करत आहात. त्यामुळे आता लवकरात लवकर जगभरातील मुस्लिमांची माफी मागा.विशेष म्हणजे प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यावरून देशात वातावरण तापले आहे. या वक्तव्याविरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. काही मुस्लीम राष्ट्रांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. देशात नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी जोर धरत असतानाच मंगळवारी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही वेळानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात ठाणे पोलिसांच्या सायबर सेलला यश आले असले, तरी सतर्कतेचा उपाय म्हणून काही वेळ वेबसाईटवर तांत्रिक दुरुस्ती केली जाणार असल्याचे पोलिसांकडून कळवण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami