संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा संपन्न, सर्वांगीण विकासाचे साकडे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पंढरपूर – आज आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात सपत्नीक पांडुरंगाची पूजा केली. ‘हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ दे. राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ दे. शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, व्यवसायिक, उद्योजक यांच्यासह समाजातील सर्व घटकांना सुख-समृध्दी लाभू दे, राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे, कोविडचे संकट कायम स्वरुपी जाऊ दे’, असे साकडे एकनाथ शिंदे यांनी या शासकीय महापूजेवेळी विठ्ठलाच्या चरणी घातले. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे मुरली भगवान नवले (वय ५२) आणि जिजाबाई मुरली नवले (४७) या वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला.

विठुरायाच्या महापूजेसाठी एकनाथ शिंदे हे आपल्या कुटुंबासह शनिवारी रात्री उशिरा पंढरपुरात दाखल झाले होते. शिंदे यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शासकीय विश्रामगृहातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय विठ्ठल मंदिरात दाखल झाले आणि शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यावेळी उपस्थित होते. महापूजेनंतर मंदिर समितीच्या कार्यक्रमातदेखील मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी पंढरपूर शहराचा तिरुपतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दरम्यान, महापुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी असलेल्या नवले दाम्पत्याचा यथोचित सन्मान करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami