संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

शिवसैनिकाने समोर येऊन सांगावं मी नालायक; मग मुख्यमंत्रीपद सोडणार!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर आज झालेल्या बैठकांना शिवसेनेचे काही आमदार, खासदार गैरहजर राहिल्याचे दिसले. शिवाय काँग्रेसने आपले वरिष्ठ नेते कमलनाथ यांना राज्यात पाठवले आहे, तर शरद पवार यांनी आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. या सर्व घडामोडींवर अखेर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज संध्याकाळी जनतेशी संवाद साधून, शिवसैनिकांनी समोर येऊन सांगावं मी मुख्यमंत्रीपदासाठी नालायक आहे, मग त्यानंतर मी मुख्यमंत्रीपद सोडतो, असे म्हटले. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे त्यामुळे खुर्चीला चिकटून बसणाऱ्यातला नाही. तुम्ही बोललात तर शिवसेना अध्यक्षपदही सोडेन आणि वर्षावरून मातोश्रीवर राहायला जाईन, पण समोर येऊन बोला आणि शिवसैनिकांनीच बोला, नाहीतर इतर फडतूस लोक बोलायला आहेतच, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या नाराज नेत्यांना आवाहन केले आणि भाजपावर टीकास्त्र डागले. तसेच शरद पवार आणि कमलनाथ यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधून आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, आता यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार, ते मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर बोट ठेवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महत्त्वाचे म्हणजे आज संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात त्यांची निवड टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये झाली होती, याचा उल्लेखही केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami