सावंतवाडी- सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. भराडीमातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चिपी विमानतळावर दाखल झाले . बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, अनारोजीन लोबो, निता कविटकर, सचिन वालावलकर आदींनी विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी कोकणात शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर ते थेट मालवणच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार, खासदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदेंनी भराडी देवीचे दर्शन घेतले. यानंतर स्थानिकांना संबोधताना शिंदे म्हणाले की, कोकणच्या विकासासाठी कोकण नियोजन प्राधिकरण लवकरच स्थापन करणार आहोत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग ते मुंबई मार्ग विकसित करु, सागरी महामार्गाचा विकास करुन पर्यटनाला चालना देणार असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. देशावर आणि राज्यावरचे अरिष्ट दूर कर , बळीराजाला समृद्ध आणि सर्वसामान्यांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.