संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – “मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका, लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्रीमती चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “ महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा आवाज एक मोठा ठेवा आहे. त्यांना आवाजाचे वरदानच मिळाले होते. या आवाजाची ताकद ओळखून त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि कलासाधनेतून अनेक गाणी अजरामर केली. मराठी लोककलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या लावणीमध्ये तर त्यांनी श्वासच फुंकला. लावणीची नजाकत त्यांनी आपल्या सुरांनी जीवंत केली. त्यामुळंच तमाशा फडातील ही लावणी घऱाघरात आणि मनामनापर्यंत पोहचली. पार्श्वगायनासह, लावणीचे विविध प्रकार त्यांनी खुलवून सादर करत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून उमेदीच्या काळात विविध कारणांसाठी निधी उभारणीकरिता जाहीर कार्यक्रम केल्याची उदाहरणे आजही दिली जातात. अशा लोककलेशी आणि समाजाशी एकरूप सहृदय महान कलावंताचे निधन हे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ गायिका, लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दरम्यान, श्रीमती चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami