मुंबई – कोरोना केंद्रांची उभारणी, रस्ते बांधणी व जमीन खरेदी आदी सुमारे 12 हजार कोटी रुपयांच्या मुंबई महानगरपालिकेच्या 76 कामांची ‘कॅग’कडून चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती ‘कॅग’ने मान्य केली आहे.पालिका निवडणुकींच्या तोंडावर होणार्या चौकशीमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहेत. या चौकशीत कोणताही राजकीय हेतू न ठेवता पारदर्शकता असेल. त्यामुळे सर्व सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रस्त्यांची कामे, सफाई कामगारांच्या घरांसाठी असलेल्या आश्रय योजना, भेंडी बाजार पुनर्विकासात रस्त्याची रुंदी कमी करून विकासकाचा झालेला फायदा, मुंबई पालिकेतील काही अधिकारी-कर्मचार्यांनी स्वत:च कंपन्या सुरू करून पालिकेची कामे लाटल्याचा आरोप, या सर्वांची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसेच कोरोना काळात मुंबई पालिकेने शहरात उभारलेल्या कोरोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. यातील काही प्रकरणे गंभीर असल्याने त्यांचे महालेखापरीक्षक व नियंत्रकाकडून (कॅग) विशेष लेखापरीक्षण करण्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता कॅगने राज्य सरकारच्या विनंतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसण्याची चर्चा होत आहे.