पुणे – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज पुन्हा एकदा या महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारने कोळसा भरलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. आज शुक्रवारी सकाळी सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातातील मृतांची नावे -विजय विश्वनाथ खैर आणि राहुल कुलकर्णी अशी असून अन्य एकाची ओळख पटवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मयत खैरे आणि कुलकर्णी हे सातारा येथील रहिवासी आहेत. अपघात इतका भयानक होता की, यात कारचा चक्काचूर झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार चालली होती. यादरम्यान उर्से गावच्या परिसरात आडे गावाजवळ आल्यानंतर अतिवेगात असताना कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. ही धडक एवढी भीषण होती की त्यातील चालकासह अन्य दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तिघांचे शीर धडावेगळे झाले. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळित अपघाताची माहिती मिळताच महामार्ग आणि शिरगाव परंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.