मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर पुढील दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाच्या १०० शिवाई बसेस धावणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर सध्या धावत असलेल्या शिवनेरी बसेस कालांतराने थांबवण्यात येतील. त्या ऐवजी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक शिवाई बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू केल्या जातील. या बसला एशियाड बसचा लूक देण्यात आला आहे.
मुंबई-पुणे प्रवासासाठी शिवनेरी बसच्या तिकीटाचा खर्च साधारण ४५०-५०० रुपये येतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी ही रक्कम परवडणारी नाही. पेट्रोलचे भाव वाढल्याने अजून या तिकीटांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र नव्याने रुजू झालेली शिवाई ही इलेक्ट्रिक बस आहे. त्यामुळे याचे तिकीटदर कमी साधारण ३००-३५० रुपये असण्याची शक्यता आहे. ठाणे-पुणे, दादर-पुणे, नाशिक-पुणे, कोल्हापूर-स्वारगेट, औरंगाबाद-शिवाजीनगर, पुणे-बोरीवली या मार्गांवरही शिवाई बस धावणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात शिवाई धावणार असा एसटी महामंडळाचा विचार आहे. सर्वाधिक चालणाऱ्या मार्गावर शिवाई बस अधिक प्रमाणात चालवल्या जाणार आहे. ‘जिथे गाव, तिथे एसटी’ अशी संकल्पना अनेक वर्षांपुर्वी एसटी महामंडळाने राबवली होती. त्यानुसार आज प्रत्येक गावागावात एसटी सहज बघायला मिळते. पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. मात्र येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे.