मुंबई :मुंबईची हवा दिल्लीएवढीच अत्यंत खराब नोंदविण्यात आली असून, थंडी संपेपर्यंत मुंबईमधील प्रदूषण या कारणामुळे असेच कायम राहील, अशी भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही दिवस आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील प्रदूषणाची पातळी धोकादायक बनली आहे. लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या हवेतील प्रदूषणाची पातळी अत्यंत वाईट स्थितीत पोहोचली होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक, डॉ. व्ही. एम. मोटघरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला, वरळीसह लगतच्या परिसरात धूलीकण वातावरणात पसरले आहेत. आता हवेचा वेग कमी आहे. त्यामुळे धूलीकण हवेतून वाहून जात नाहीत. हिवाळ्यात धूलिकण जास्त वर जात नाहीत. ते जमिनीवर राहतात. त्यामुळे प्रदूषण वाढते आहे. मुंबई विकासाच्या टप्प्यावर आहे. विविध कामे सुरू आहेत. इमारतींची बांधकामे सुरू आहे. यातून उठणारे धूलिकण वातावरणात असंधीक प्रमाणात मिसळत असल्याचे ते म्हणाले. तसेच, जसजशी हवेची गती वाढेल तसे हे प्रदूषण कमी होईल. किमान दोन ते तीन दिवस हे प्रदूषण कायम राहणार आहे. मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या आयुक्तांना राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यकमांतर्गत उपाय योजावे, असे सांगण्यात आले आहे. मागच्या आठवड्यात तशा सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितलं.
या प्रदूषणाचा विशेष परिणाम हा दमा असणाऱ्या रुग्णांना अधिक जाणवतो. त्यामुळे यातील ज्येष्ठ व आजारी लाेकांना थेट रुग्णालय गाठावे लागत असून, महिन्या-दोन महिन्यांच्या अंतराने फाॅलोअपसाठी येणारे दम्याचे रुग्ण मागील काही दिवसांत हे प्रमाण वाढले असल्याचे जे. जे. रुग्णालय श्वसनविकारतज्ज्ञ, डॉ. प्रीती मेश्राम, यांनी स्पष्ट केले आहे. तर या वातावरणात सामान्यांनी म्हणजेच श्वसनविकार नसणाऱ्यांनी मास्क घालण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.