संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

मुंबईतील दोन मेट्रो मार्गांना
अदानी कंपनीचा वीजपुरवठा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई -भारतातील उद्योगपती गौतम आदानी यांच्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीकडून मुंबईतील मेट्रो लाईनला वीज पुरवठा करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडसोबत त्यांच्या दोन मेट्रो लाईन – मेट्रो- २ ए (दहिसर- डी.एन नगर) आणि मेट्रो- ७ (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व) सोबत भागीदारी करार केला आहे. याद्वारे दरवर्षी १२ कोटी युनिटपेक्षा अधिक वीज वापरली जाणार आहे. त्यामुळे या पुढे मुंबई मेट्रोला अदानी कंपनीकडून वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट आणि राज्य वीज वितरण उपक्रम म्हणजेच महावितरण या दोन प्रमुख सार्वजनिक कंपन्यांसह टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यासारखे अनेक वीज वितरक आहेत. राज्यभर याच कंपन्यांकडून वीज पुरवठा करण्यात येतो. गौतम अदानी यांची अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड ही वीज पुरवठा करणारी खासगी कंपनी आहे.या कंपनीकडून राज्यातील अनेक उद्योग व्यवसायांना वीज पुरवठा करण्यात येतो.शिवाय ही कंपनी मुंबई उपनगरातील ३१ लाखांहून अधिक घरांना तसेच व्यावसायिकांना वीज पुरवते.आता या कंपनीकडूनच मुंबईतील मेट्रोला देखील वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
“गेल्या काही वर्षांत विमानतळ,डेटा सेंटर, रुग्णालय,मेट्रो रेल्वे, सॉफ्टवेअर पार्क आणि हॉटेलसारख्या ऊर्जा-केंद्रित आस्थापनांनी अदाणी इलेक्ट्रिसिटीला त्यांची प्रमुख पुरवठादार कंपनी म्हणून निवडले आहे.याद्वारे समर्थित स्पर्धात्मक दरांमध्ये विश्वासार्ह आणि शाश्वत वीज पुरवठ्यामुळे तसेच ग्राहक-केंद्रित सेवा देत असल्यामुळे कंपनी अल्पावधीत लोकप्रिय बनली आहे”,असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.पर्यावरणपूरक विजेचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न कायम राखताना अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी २०२७ पर्यंत ६० टक्केपर्यंत हिस्सा विस्तारण्याच्या वचनबद्धतेसह अक्षय ऊर्जा स्त्रोताचा अधिकाधिक उपयोग करून मुंबईतील ३० टक्के विजेची मागणी पूर्ण करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे.उर्जेचे उद्दिष्ट पुन्हा एकदा परिभाषित होत असून यापुढे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक,
विश्वासार्ह आणि शाश्वत असेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami