मुंबई – मुंबई शहरातील दूध दरात पुन्हा एकदा वाढ होणार आहे.मुंबई दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर ५ रुपयांनी वाढ केली असून ही दरवाढ १ मार्चपासून प्रत्यक्ष लागू केली जाणार आहे, अशी माहिती मुंबई दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष सीके सिंग यांनी दिली आहे.
नवीन दूध दरवाढीचा निर्णय गुरुवारी उशीरा मुंबई दूध उत्पादक संघाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. याबाबत संघाचे अध्यक्ष सीके सिंग म्हणाले की, शहरात म्हशीचे दूध ३ हजारहून अधिक विक्रेत्यांकडून विकले जाते. सध्या त्याची किंमत ८० रुपये प्रति लीटर इतकी असून १ मार्चपासून ते ८५ रुपये प्रति लीटर दराने विकले जाईल. ही दरवाढ ३१ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे.दुभत्या जनावराच्या खाद्यांचे दर १५ ते २५ टक्के वाढले आहेत. याशिवाय गवताचे दरही वाढले असून त्यामुळे दूधाचे दरही वाढवायला हवेत,तशी मागणी काही सदस्यांनी केली होती.मुंबईत दरदिवशी ५० लाखांपेक्षा जास्त लीटर म्हशीच्या दुधाची विक्री करते.दरम्यान,दुधाच्या दरात सप्टेंबर २०२२ मध्ये वाढ करण्यात आल्यानतंर ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.तेव्हा दुधाची किंमत ७५ रुपयांवरून ८० रुपये अशी केली होती.