मुंबई – मुंबई शहराच्या साळशेत बेटावरील मिठी नदी विहार आणि पवई तलावातून सुरू होते आणि बोरिवली राष्ट्रीय उद्यानातून वाहत माहीमच्या खाडीला मिळते. हीच मिठी नावाची पण अस्वच्छ स्वरूपाची बनलेली नदी स्वच्छ करण्यासाठी तब्बल १७ वर्षे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.तरीही या नदीला पूर्णपणे पुनरुज्जीवित करता आलेले नाही.त्यामुळे आता नदीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी सन २०२३-२४ च्या पालिकेच्या अर्थसंकल्पात पॅकेज २ व पॅकेज ३ यामधील विविध कामांसाठी पुन्हा नव्याने ६५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई शहरात २६ जुलै २००५ रोजी झालेल्या जल प्रलयानंतर मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि गाळ काढण्याच्या कामावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात मिठीचा धोका टळलेला नाही.नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून नदीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. नदीची धारण क्षमता दुपटीने आणि वहन क्षमता तिपटीने वाढल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात नदीच्या विकासाचा आणि प्रदूषण नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला असून त्याची चार पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात मिठी नदीच्या विकासाचे काम ठप्प झाले होते. या कामाला पुन्हा वेग देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.नदीतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मे. फ्रिशमन प्रभू यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सल्लागाराने दिलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे केली जात आहेत. यातील टप्पा क्रमांक एकमध्ये फिल्टरपाडा,पवई ते डब्ल्यू. एस. पी. कंपाऊंड दरम्यान नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी अडवून ते मिठी किनाऱ्यालगत नियोजित मलनिःसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेले जाणार आहे. डब्ल्यू. एस. पी. कंपाऊंड येथे प्रस्तावित आठ दशलक्ष घनलिटर क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित आहे.