मुंबई- मुंबईतील सरकारी व खाजगी वीज कंपन्यांनी दिलेल्या वीज दरवाढ बाबतच्या प्रस्तावित दरांबाबतची सुनावणी पूर्ण झाली. या सुनावणीत सहभागी झालेल्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. त्यानंतर आयोगाने दरवाढ मंजूर केली तर १ एप्रिल पासून वाढीव दर लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांचे महिन्याचे बजेट मात्र कोलमडणार आहे.
वीज वितरण कंपन्यांची पंचवार्षिक वीज दरनिश्चिती १ एप्रिल २०२० पासून झाली. तिसरे वर्ष संपताना या पंचवार्षिक वीज दरवाढीचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार वीज कंपन्या अंतिम दोन वर्षांसाठी नव्याने वीज दरांसंदर्भात प्रस्ताव सादर करतात. हा प्रस्ताव अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, टाटा पॉवर व बेस्ट उपक्रम या तिन्ही वितरकांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. याच प्रस्तावावर ऑनलाइन पद्धतीने सुनावणी झाली. या तिन्ही कंपन्यांची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली. त्यानुसार अदानींकडून २ ते ७ टक्के, तर टाटा पॉवरकडून १० ते ३० टक्के आणि बेस्टकडून १८ टक्क्यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे.