वडगाव- १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाइन डे’म्हणून साजरा केला जातो. याच ‘व्हॅलेंटाइन डे’साठी वडगावच्या मावळ तालुक्यातून परदेशात सुमारे ५० लाख फुलांची निर्यात झाली असून, स्थानिक बाजारपेठेतही फुलांना मोठी मागणी तसेच चांगला दर मिळत आहे. त्यामुळे बहुतेक उत्पादकांनी निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेलाच प्राधान्य दिले. मात्र, दोन्हीकडे दर चांगला मिळाल्याने फूल उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सलग दुसऱ्या वर्षी व्हॅलेंटाइनचा हंगाम जोरदार असल्याने कोरोना तसेच नैसर्गिक आपत्तीचा मोठा आघात सहन केलेल्या फूल उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. हवामान चांगले असल्याने तालुक्यातून मागणीप्रमाणे फुलांचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे यावेळी देश- परदेशात मिळून दीड कोटीहून अधिक फुलांची विक्री होऊन सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता फूल उत्पादकांनी वर्तवली. शेवटच्या टप्प्यात मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्यास फुलांना विक्रमी दर मिळण्याची शक्यता आहे, असे पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी सांगितले.