संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

मान्सून कोकणात दाखल; वेंगुर्ल्यात पावसाच्या सरी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वेंगुर्ला – गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणारा मान्सून अखेर आज कोकणात दाखल झाला. आज कोकणातील वेंगुर्ल्यात सकाळपासूनच पावसाच्या सरींना सुरुवात झाली त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लाऊन बसलेल्या कोकणातील शेतकऱ्याने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

दरवर्षी कोकणात मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनच्या सरी बरसतात. मात्र यावेळी मृग नक्षत्रही कोरडे जाते की काय अशी परस्थिती निर्माण झाली होती. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र उकाड्याने हैराण झाला होता आणि अखेर आज उशिरा का होईना कोकणात पावसाचे आगमन झाले. वास्तविक दरवर्षी १ जूनला मान्सून केरळात पोहचतो आणि यावर्षी तर ३ दिवस अगोदरच मान्सून केरळात पोहचला होता. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस वेळेवर सुरू होईल असे वाटले होते. हवामान खात्यानेही तसा अंदाज वर्तवला होता पण मान्सून आठवडाभर महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आणि अखेर आज कोकणात दाखल झाला.

कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ आणि मालवण या चार तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आता शेतीच्या कामांना सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या ठाणे, सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच काही प्रमाणात पाऊस झाला आहे. आता पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच येत्या पाच दिवसात अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami