- माळरानावर गुरांना न सोडण्याचे आवाहन
- नेरळ – गेल्या काही दिवसांपासुन माथेरानच्या डोंगरात बिबट्याचा वावर वाढला असून अनेकांना बिबट्याचे दर्शन घडल्याची चर्चा सुरु आहे.तर दुसरीकडे बिबट्याने धसवाडीमधील बैलाला ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे.एका टॅक्सीचालकाला माथेरान घाटात बिबट्या दिसल्याचे बोलले जात आहे.दरम्यान,बिबट्याचा वावर माथेरानच्या जंगल भागात वाढला असून ग्रामस्थांनी आपली जनावरे बाहेर बांधून ठेवू नये आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये अशी दवंडी पिटण्यास वन विभागाने सुरुवात केली आहे.
- माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या बेडीसगाव पासून बेकरे पर्यंतच्या जंगलात हा बिबट्या रात्री फिरत असल्याचे वनविभागकडून सांगण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याच्या आरोळ्या आणि कुत्र्यांंचे भुंकणे असे प्रकार सुरु आहेत.सध्या नेरळ ग्रामपंचायत भागातील लव्हाळवाडी,टपालवाडी,
- आंबेवाडी,तसेच जुमाप्पटी आणि बेकरे परिसर तसेच वांगणी जवळील बेडीसगाव मधील ९ आदिवासीवाड्या आणि आसपास असलेल्या जंगल भागात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. नेरळ हद्दीमधील धसवाडी भागातील शेतकरी हरिदास लक्ष्मण आखाडे यांच्या बैलाटी शिकार बिबट्याने केली आहे.नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास चरायला सोडलेल्या जनावरांपैकी या बैलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले आहे.पहाटेच्या वेळी धसवाडी पासून ७०० मीटर अंतरावरील जंगलात सकाळी गवत कापण्यासाठी गेलेले असताना हरिदास आखाडे यांना आपल्या बैलावर बिबट्याने हल्ला केला.बिबट्याने त्या बैलाचा एक कान कापून नेला असून त्या बैलाच्या पाठीमागील शेपटीच्या बाजूला मांस ओढून नेले होते.