मुंबई- शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया करणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही बंधनकारक आहे. त्यामुळेच आता मातोश्री बंगल्याच्या मुख्य दालनातील भिंतीवरील धनुष्यबाण चिन्ह हटवले आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय आला नव्हता, तोपर्यंत ठाकरेंकडून मातोश्रीच्या मुख्य दालनात धनुष्यबाण आणि मशाल ही दोन्ही चिन्हे लावण्यात आली होती. तसेच शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नाव होते. मात्र काल आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीच्या मुख्य दालनातील धनुष्यबाण काढून टाकण्यात आल्याचे दिसून आले. मातोश्रीतील धनुष्यबाण चिन्ह गायब झाल्याचे पाहिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. सुरुवातीला ठाणे आणि मुंबई महापालिकेची निवडणूक झाली, तेव्हा ढाल-तलवार हे शिवसेनेचे मुख्य चिन्ह होते. त्यानंतर रेल्वे इंजिन, मशाल आदी चिन्ह मिळाली. 1989 मध्ये शिवसेनेला अधिकृतरित्या धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले.