सवाई माधोपुर:
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दिवसेंदिवस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सध्या भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये आहे. बुधवारी सवाई माधोपुर जिल्ह्यातील भदोती येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली होती. या यात्रेत आरबीआयचे माजी गव्हर्नर एन रघुराम राजन यांनी सहभाग घेतला होता. रघुराम राजन यांनी भदोती येथून चालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी राहुल गांधींसोबत दीर्घ संवाद साधला होता.
काँग्रेसने सोशल मीडियावर राहुल गांधी आणि रघुनाथ राजन दोघांचे फोटो व्हायरल केला. या फोटोला कॅप्शन देत काँग्रेसने लिहिले आहे की, ‘द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आपण यशस्वी होऊ हे दर्शवत आहे. रघुराम राजन हे मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर राजन हे देखील गव्हर्नर पदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर ते शिक्षण क्षेत्राकडे वळले. राजन यांनी अनेकदा मोदी सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती.
अगदी काही दिवसांपूर्वीच माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले होते की, “सध्या आपली अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही. तरीही सरकार हे सत्य स्वीकारण्यास तयार नाही. आर्थिक मंदीच्या समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारला ही समस्या मान्य करावी लागेल. कारण ती लपवून ठेवल्याने परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नाही. जगभरात भारताची प्रतिमा ‘अल्पसंख्यांक विरोधी’ म्हणून तयार झाली आहे. असे असेल तर भारतीय कंपन्यांना मोठे नुकसान होऊ शकते.
भारत जोडो यात्रेत विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती सातत्याने सामील होत आहे. यापूर्वी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी यात्रेत सहभागी घेतला होता. दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, 16 डिसेंबरला यात्रेला 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राहुल गांधी जयपूरला जाणार असून तेथील संगीत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.