पंढरपूर: माघ शुद्ध एकादशीनिमित्त ‘श्री विठ्ठल रुक्मिणी’ मंदिरात फुलांची आरास करण्यात आली.विठ्ठल मंदिरात आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली. विठ्ठल मंदिराला फुलांनी सजवलल्याने संपूर्ण मंदिर सुगंध दरवळला होता.त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, बुधवारी पहाटे एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची तर सदस्य दिनेशकुमार कदम यांच्या हस्ते रुक्मिणीची महापूजा पार पडली. माघी एकादशीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेची भव्य रांगोळी देखील साकारण्यात आली.माघी एकादशीचा सोहळा होत असताना पंढरपूरमध्ये चंद्रभागेचे पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. मागील वर्षी कोरोनामुळे माघी यात्रेदरम्यान काही निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे माघी यात्रेला भाविकांची अपेक्षित गर्दी झाली नव्हती. यावर्षी मात्र निर्बंध मुक्त वातावरणामध्ये माघी यात्रेचा सोहळा साजरा मोठ्या उत्साहात पार पडला.