नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019च्या कलम 194 (ब) (1) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मागच्या व्यक्तीने सीटबेल्ट न लावल्यास 1 नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई होणार आहे. 1000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार अपघात मृत्यू झाला होता. मिस्त्री यांचा अपघात झाला, त्यावेळी मागच्या आसनावर बसलेल्या मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता. मिस्त्री यांचा अपघात आणि एकूणच रस्ते अपघातातील वाढते मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील टॅक्सीचालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. या नियमातून टॅक्सीला वगळण्यात यावे, अशी मागणी वाहतूक पोलिसांना केली आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने वाहतूक विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मुंबई महानगरामध्ये टॅक्सी या अधिक धावतात. काळी-पिवळी टॅक्सीचालकांना चार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र पाठीमागे तीन प्रवासी बसत असल्याने तसेच कार उत्पादकांनी मागच्या दोनच सीटना सीट बेल्टची सुविधा दिल्याने तिसरा प्रवासी सीट बेल्ट लावू शकत नाही.