पुणे- पुणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता घरात मांजर पाळायचे असेल तर त्यासाठी पालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुढील ८ दिवसांत परवाण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आतापर्यंत कुत्रा, घोडा अशा पाळीव प्राण्यांसाठीच परवाना लागत होता. मात्र आता मांजरालाही तो बंधनकारक केला आहे.
महापालिकेच्या कायद्यातील तरतुदीनुसार कुत्रा आणि घोडा अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रीतसर परवाना घेणे बंधनकारक होते. परंतु आता त्यात मांजराचाही समावेश केला आहे. मांजरे पाळण्याचा त्रास शेजाऱ्यांना होत असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. एका घरात १०-१५ मांजरे पाळली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मांजरांवरून निर्माण झालेले वाद पोलिस ठाण्यातही जातात. त्यामुळे आता पुणे महापालिकेने कुत्र्यांप्रमाणे पाळीव मांजरासाठीही महापालिकेकडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी वार्षिक शुल्क ५० रुपये आहे. रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी २५ रुपये नूतनीकरण शुल्क आकारले जाणार आहे.