कोल्हापूर: राज्यात गेल्या दोन दिवसात सीमा प्रश्नावरुन मोठे रणकंदन माजले आहे. सीमावर्ती भागावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा सांगितल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र – कर्नाटक बस सेवा तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रवाशांच्या गैरसोय होऊ नये म्हणून पुन्हा या बस सेवा सुरु झाली आहे.
दोन्ही राज्यांतील असंख्य नागरीक दररोज बसने प्रवास करत असतात.महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमा प्रश्नावर वातावरण चांगलेच तापले होते. दोन्ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बस सेवा तात्पुरती बंद केली होती. मात्र आता ही सेवा बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांनी प्रवास सुरू केला आहे.
दरम्यान,दौंड येथील मराठा महासंघाचे कार्यकर्त्यांनी कर्नाटक एसटी महामंडळाच्या निपाणी-औरंगाबाद एसटीला काळे फासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध केला होता. दौंडमधून जाणाऱ्या कर्नाटक एसटीवर जय महाराष्ट्र आणि जाहीर निषेध असा मजकूर लिहिण्यात आला तसेच कानडी भाषेतील मजकूर काळे फासण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्राच्या बसला कलबुर्गी इथे काळे फासण्यात आले होते. या साऱ्यांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद केली होती.