मुंबई : महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. मात्र महाराष्ट्रात उद्योग येण्याकरिता वेटिंगलिस्टवर असून सरकार लवकरच बेकारी दूर करेल असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्र आणि मुंबईत उद्योग वेटिंग लिस्टवर आहेत.
कालपर्यंत जे सत्तेवर होते, ते राज्यामध्ये उद्योग आणू शकले नाहीत, ते आता टिका करत आहेत. प्रकल्प गेले तसे येतील. उद्योग महाराष्ट्रात यावेत याकरता पोषक वातावरण या नव्या सरकारकडून निर्माण केले जाईल, असा माझा विश्वास आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यांच्या या मागणीला नारायण राणेंनी विरोध केला आहे. नारायण राणे म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर न करता मदत मिळत आहे. ओला दुष्काळ जाहीर करायला काही निकष असतात. नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यासाठी काही निकष लावले जातात. त्या निकषानुसार ओला दुष्काळ जाहीर केला जातो, असे राणे म्हणाले.याशिवाय राज्यात सुरु असणाऱ्या वक्तव्यावरील वादावरून राणेंनी सत्तारांचा प्रश्न वेगळा आहे, मला बोलायचे नाही. मनोरंजनाचा विषय मी हाताळत नाही. मी उद्योग द्यायला चाललो आहे. देशाच्या प्रगतीविषयी मला विचारा, मी बोलू शकेन, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली.